सेवावर्धिनी ही संस्था मागील 26 वर्षांपासून महाराष्ट्रातील विविध सहयोगी संस्थांसोबत संस्था बांधणी, महिला सक्षमीकरण, ग्रामीण विकास, आरोग्य, जलसंधारण यांसारख्या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. यंदाच्या दिवाळीच्या निमित्ताने सेवावर्धिनीने दुर्गम भागातील जनजाती महिलांसाठी विशेष दिवाळी किट वितरण मोहिम राबवली. या उपक्रमाचा उद्देश सणासुदीच्या काळात महिलांना आनंद देणे, त्यांना सन्मानाची जाणीव करून देणे आणि त्यांच्यासोबत एक सामाजिक संवाद साधणे हा होता.
दिवाळी हा सण प्रकाशाचा आणि उत्साहाचा आहे. मात्र, अनेक दुर्गम भागातील जनजाती कुटुंबांना या सणाचा खरा आनंद घेणे शक्य होत नाही. सेवावर्धिनीने या कुटुंबांना दिवाळीचा आनंद मिळावा म्हणून सुमारे हजार महिलांना दिवाळी किट वाटपाचा उपक्रम हाती घेतला. या किटमध्ये साडी, फराळाचे साहित्य, उटणे व सुगंधी अभ्यंग तेल यांचा समावेश करण्यात आला होता.
दिवाळी किटच्या तयारीसाठी सेवावर्धिनीचे कार्यकर्ते व स्वयंसेवकांनी संपूर्ण नियोजनबद्ध पद्धतीने काम केले. सर्व वस्तूंची गुणवत्ता तपासून त्या जपून पॅक करण्यात आल्या. वितरणासाठी संस्थांनी त्यांच्या गरजा आणि पोहोच पद्धतीनुसार किट्स स्वीकारल्या. काही किट्स कुरियरद्वारे, काही प्रवासी सेवेद्वारे तर काही कार्यालयातून प्रत्यक्ष घेतल्या गेल्या.
वितरणातील सहयोगी संस्था व प्रकल्प :
संसदीय संकुल विकास परियोजना (भोरमाळ व नंदुरबार)
जनजाती कल्याण आश्रम
शिवसेवा प्रतिष्ठान, लोणावळा
NEED (गडचिरोली व यवतमाळ)
नवी उमेद, पांढरकवडा
किसान बहुउद्देशीय संस्था, यवतमाळ
राष्ट्रीय सर्वांगीण ग्रामविकास संस्था, मुळशी
डोंगरवाटा जनजीवन सामाजिक सेवा संस्था
या उपक्रमासाठी विविध देणगीदारांकडून सहकार्य मिळाले. सोशल मीडिया आणि वेबसाइटवर जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर मिळालेला प्रतिसाद उत्तम होता. अनेक देणगीदारांनी मोठ्या प्रमाणावर या उपक्रमात सहभाग घेतला. अजूनही काही देणगीदारांनी त्यांचे योगदान देणे बाकी असल्यास, त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा अशी विनंती करण्यात येत आहे.
दिवाळी किट वाटप उपक्रमाने सुमारे हजार महिलांना आनंदाचा अनुभव दिला. या उपक्रमामुळे केवळ सण साजरा करण्याची संधी मिळाली नाही, तर सेवावर्धिनी व सहयोगी संस्थांमधील संबंध अधिक घट्ट झाले. महिलांनी या वस्तू केवळ उपभोगाच्या वस्तू नसून आपल्यावरील प्रेमाचा आणि आदराचा प्रतीक मानले.
सेवावर्धिनीचा हा उपक्रम समाजातील गरजू लोकांसाठी आनंददायी ठरला. या यशस्वी मोहिमेमुळे समाजाच्या विविध स्तरांतील लोकांपर्यंत सेवावर्धिनीची सेवा पोहोचली. भविष्यातही अशा अनेक उपक्रमांसाठी सेवावर्धिनी प्रयत्नशील राहील.
सेवावर्धिनी परिवाराकडून सर्व देणगीदार, स्वयंसेवक, व सहयोगी संस्थांचे मनःपूर्वक आभार !